चेन्नई : राष्ट्रीय तपास यंत्रणे(एनआयए)ने तामिळनाडूतील कोयंबत्तूरमध्ये छापेमारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने कोयंबत्तूर शहरातील उक्कदम, बिलाल नगर, करुम्बुकदाई सह पाच ठिकाणी छापा टाकला असून आतापर्यंत लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड आणि पेन ड्राईव्ह जप्त केले आहे.
एनआयएच्या रडावर असलेल्या उमर फारूक, सनाबर अली, समीना मुबीन, मुहम्मद यासिर, सदम हुसैन यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहे. मात्र, अजूनही एनआएची छापेमारी सुरु असून अद्याप कोणत्या प्रकरणी ही छापेमारी सुरु आहे, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दहशतवादी श्रीलंकेमार्गे तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.