मुंबई : रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. खातेदारांना आता केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.
सरकारने खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेवर 30 दिवसांचे निर्बंध आणले असून या काळात 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेमध्ये आज संध्याकाळपासूनच हे निर्बंध लागू झाले आहेत. हे निर्बंध 3 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.
बॅकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे आरबीआयने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून येस बँकेच्या संचालक मंडळाला 30 दिवसांसाठी निलंबित केले आहे. एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
येस बँकेने वितरीत केलेली बहुतांश कर्जे बुडली आहेत, बँक यामधून सावरू शकत नाहीय. नवीन भांडवल उभे करण्यासाठी बँक झगडत आहे. या कारणास्तव, बँकेने डिसेंबर 2019 चा तिमाही निकाल जाहीर केला नव्हता. एनपीएमुळे बँकेची पत घसरली आहे.
काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर पीएमसी निर्बंध घातले होते. यावेळी सुरुवातीला खातेदारांना केवळ 10 हजार रुपयेच काढण्याची मुभा होती. मात्र, लोकांच्या विरोधानंतर ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली होती.
50 हजार मिळतील पण कधी?
या 30 दिवसांमध्ये ५० हजारांहून अधिकची रक्कम काढता येणार आहे. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी लागणार आहे. वैद्यकीय उपचार, परदेशात शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे खातेदार काढू शकणार आहेत.