नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली. आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे फैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनसाठी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही पटेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विट करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता.