नवी दिल्ली - अयोध्येतील जमीन मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. उद्या १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संबंध भारताचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. या अनुषंगाने देशात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या दिला जाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यात वादातील दोन तृतीयांश जमीन मिळालेल्या हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयातील आपला युक्तिवाद संपविला आहे. ७० वर्षे जुन्या अयोध्या खटल्यात २.७७ एकर जागेचा वाद आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा न्यायपीठात समावेश आहे. रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे कायदेशीर वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात उद्या अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेजं आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्यात येणार आहे.