केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०%
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:08 AM2021-11-17T06:08:35+5:302021-11-17T06:09:51+5:30
६० टक्के लोकांनी घेतल्या लसीच्या दोन्ही मात्रा; युरोपमध्येही वाढताहेत असे रुग्ण
थिरुवनंतपुरम (केरळ) : केरळमध्ये कोरोनाचे ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे (कोरोना विषाणूवरील लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणे) रुग्ण सतत वाढत असून रोज येत असलेल्या एकूण रुग्णांमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे रुग्ण ४० टक्के आहेत. युरोपमधील अनेक देश नव्या रुग्णांनी त्रासून गेले आहेत. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या रोज नवे विक्रम करीत आहे. भारतात कोरोनाची सुरुवात केरळमधून झाली होती आणि आता याच राज्यात लस घेतलेले लोकही कोरोनाबाधित होत आहेत. इतर राज्यांतही कोरोनाचे ब्रेकथ्रू रुग्ण वाढल्यास बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.
केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढणे कमी निश्चित झाले. परंतु, आजही संपूर्ण देशात सर्वात जास्त नवे रुग्ण केऱळमधीलच आहेत. राज्यात गेल्या एक आठवड्यापासून रोज सरासरी ६,६०० नवे रुग्ण समोर येत आहेत. काळजीची बाब अशी की, रुग्णांच्या एकूण संख्येत ब्रेकथ्रू रुग्ण ४० टक्के आहेत. केरळमध्ये ९५ टक्के लोकसंख्येला लसीची पहिली मात्रा तर ६० टक्के लोकांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोनाचे २० लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. हे रुग्ण एका आठवड्यात समोर आलेले आतापर्यंतचे सर्वात जास्त आहेत.
कोरोनामुळे होत असलेल्या एकूण मृत्यूतील जवळपास निम्मे मृत्यू युरोपियन देशात होत आहेत. एकूण रुग्णांमधील ६० टक्के रुग्ण हे युरोपातील आहेत. ज्या देशांत निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे त्या देशांत रुग्ण वाढत आहेत. म्हणून अनेक देश आपल्या नागरिकांना बूस्टर मात्राही देत आहेत. जर्मनीत १० नोव्हेंबर रोजी ५१ हजार नवे रुग्ण समोर आले. हे रुग्ण आतापर्यंत एका दिवसातील सर्वात जास्त आहेत.