ब्रेकअप झाल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला जमिनीत जिवंत गाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपीला २२ वर्षे आणि १० महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियात घडली असून, कोर्टाने भारतीय वंशाच्या तरुणाला ही कठोर शिक्षा सुनावली आहे. तारिकजोत सिंग असं आरोपीचं नाव असून, २२ वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला २०४४ मध्ये पहिला पॅरोल मिळेल. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्वरित त्याला देश सोडावा लागेल.
पंजाबमधील बलाला गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या तारिकजोत सिंग याने त्याची माजी प्रेयसी जसमीन कौर हिचं ५ मार्च २०२१ रोजी अपहरण
केलं होतं. त्यानंतर तो तिला कारच्या डिक्कीमध्ये घालून अॅडलेडपासून सुमारे ६५० किमी दूर दक्षिण ऑस्ट्रेलियात घेऊन गेला होता. त्यानंतर फ्लिंडर्स रेंज्समधीली दफनभूमीत त्याने तिला जिवंत गाडले होते.
तारिकजोत हा २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे जाऊन स्थायिक झाला होता. तिथे त्याची ओखळ जसमीन कौर हिच्याशी झाली होती. मात्र नंतर या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र हे ब्रेकअप तारिकजोतला सहन झालं नव्हतं. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने जसमीत कौर हिचा गला कापल्यानंतर तिला जिवंत गाडले. मात्र जखमा आणि जिवंत गाडल्यानंतरही जसमीतचा मृत्यू झाला नव्हता. ६ मार्चच्या आसपास तिचा जेव्हा मृत्यू झाला. तेव्हा तिला तिच्या आसपास काय घडतंय, याची तिला जाणीव होती. याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार सरकारी वकील कारमेन मॅटियो यांनी कोर्टात सांगितले की, जसमीत कौर हिचा मृत्यू खूपच वेदनादायी होता. तिने पूर्ण शुद्धीमध्ये मृत्यूच्या वेदना सहन केल्या होत्या. दरम्यान, आरोपी तारिकजोत याने गुन्हा कबूल केला होता.
दरम्यान, पंजाबमधील बलाला गावात राहणाऱ्या तारिकजोत याच्या आई-वडिलांना त्याला शिक्षा झाल्याची माहिती बुधवारी मिळाली आहे. मुलाला झालेल्या शिक्षेमुळे त्यांना धक्का बसला आहे.