पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुळ गाव असलेल्या वडनगरची सध्या ससंपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. येथे 2800 वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. येथे विटांच्या भिंती आणि पक्क्या नाल्या दिसून आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे तीन हजार वर्ष होऊनही येथील भिंतीं पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. येथून इतिहासासंदर्भात अनेक नव्या गोष्टी समोर येऊ शकतात.
आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जेएनयू आणि डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी हे अवशेष शोधून काढले आहेत. IIT खरगपूरने एका निवेदनात म्हटले आहे की, वडनगरमध्ये सखोल पुरातत्विय उत्खननाच्या अध्ययनातून समोर आले आहे की, 3,000 वर्षांच्या कालावधीत विविध साम्राज्यांचा उदय, अस्त आणि मध्यआशियातून आलेल्या हल्ले खोरांचे भारतावरील वारंवार होणारी आक्रमने, पाऊस अथवा दुष्काळ यासारखे हवामानातील गंभीर बदल झाले.
खोदकामात काय काय आढळलं? -वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव आहे. महत्वाचे म्हणज, हे बहू धार्मिक आणि बहू सांस्कृतिक (बौद्ध, हिंदू, जैन आणि इस्लाम) केंद्र राहिलेले आहे. यासंदर्भात बोलताना एएसआय पुरातत्वशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर म्हणाले, ‘या खोद कामात, मौर्य, इंडो-ग्रीक, शक-क्षत्रप, हिंदू-सोलंकी, सल्तनत-मुगल (इस्लामिक) गायकवाड-ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या अस्तित्वासंदर्भात माहिती मिळाली आहे. आमच्या या खोदकामात सर्वात जुना बौद्ध मठही सापडला आहे.’
ग्रीक राज्यांच्या नाण्यांचे साचेही आढळले - आंबेकर म्हणाले, ‘आम्हाला विशिष्ट पुरातत्व कलाकृती, मातीची भांडी, तांब्याच्या, सोन्याच्या, चांदीच्या आणि लोखंडाच्या वस्तू आणि महीन डिझाइनच्या बांगड्या सापडल्या आहेत. याशिवाय, इंडो-ग्रीक शासन काळातील ग्रीक राजा अपोलोडेटसच्या नाण्याचे साचेही सापडले आहेत.’ महत्वाचे म्हणजे, प्राचीन इतिहासापासून मध्ययुगीन काळापर्यंत अचूक कालगणनेसह पुरातत्वशास्त्राची अशी अखंड नोंद वडनगरशिवाय भारतात इतर कोठेही आढळत नाही. या दृष्टीनेही वडनगर वेगळे आहे, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.