BRICS Summit in Russia : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसाठी दोन दिवसीय (२२-२३ ऑक्टोबर) रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, असे रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले. 'आजतक' या वृत्तवाहिनीशी बातचीत करताना विनय कुमार म्हणाले, "या परिषदेत आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यासारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यावर भर दिला जाईल."
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी संभाव्य भेटीबाबत विचारले असता विनय कुमार म्हणाले की, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु द्विपक्षीय बैठकीच्या अजेंड्यावरही काम सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या द्विपक्षीय बैठकांचा विचार केला जात आहे. तसेच, आम्हाला वाट पाहावी लागेल आणि कोणत्या बैठकांमध्ये निर्णय घेतला जातो ते पाहावे लागेल. रशिया आणि युक्रेनमधील २० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध तसेच मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे, असे विनय कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्त घालण्याबाबत चीनशी एक करार केल्याची घोषणा भारताने सोमवारी केली आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. यातच आता रशियामध्ये होणाऱ्या या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर ही कराराची घटना महत्त्वाची मानली जात आहे.
दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणारदुसरीकडे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत व चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासंदर्भात झालेला करार ही महत्वाची घटना आहे. आता दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणार आहेत. संयम राखून ज्या राजनैतिक हालचाली केल्या त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. पूर्व लडाखच्या सीमेवर २०२० साली शांतता होती. तशीच स्थिती पुन्हा निर्माण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.