शियामेन. दि. 5 - ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास'चा नारा दिला आहे. मंगळवारी 'डायलॉग ऑफ इमर्जिंग मार्केट्स अँण्ड डेव्हलपिंग कंट्रीज' कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा नारा दिला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाच्या आर्थिक विकासासाठी सबका साथ, सबका विकास गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात पुढे येत असलेल्या देशांमध्ये सहकार्य महत्वाचं असल्याचं सांगितलं. पुढील दशक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. पुढील दशक सुवर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलले आहेत की, 'आमच्या विकासाची संकल्पना सबका साथ सबका विकास सिद्धांतावर आधारित आहे'. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत दहशतवादाशी लढण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. मोदींनी यावेळी हवामान बदलाचा गंभीर मुद्दाही उपस्थित केला, आणि हरित जगासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं.
विशेष म्हणजे दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आले असून, भारताचा हा विजय मानला जात आहे. पंतप्रधान आजच चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.
अतिरेकी कारवाया घडवून आणणारे, कट कारस्थान करणारे आणि सहकार्य करणा-यांना जबाबदार ठरविले पाहिजे, असा सूर या संमेलनातून उमटला. या दोन संघटनांसह अन्य अतिरेकी संघटनांवर कारवाईची मागणी ब्रिक्स देशांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी या अतिरेकी कारवायांचा कठोर शब्दांत निषेध केला. सर्वांनी मिळून या समस्येविरुद्ध लढले पाहिजे, यावर भर दिला.
मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांसह तालिबान, इसिस आणि अल कायदा यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची मागणी ब्रिक्स देशांनी केली. हक्कानी नेटवर्क, तसेच शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर अंकुश आणला जावा, अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करणे, अतिरेक्यांकडून इंटरनेट, सोशल मीडियाच्या होणाºया वापरावर प्रतिबंध आणणे, यांचाही घोषणापत्रात समावेश आहे. पाकमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्सच्या परिषदेत उपस्थित करू नये, असे चीनने पंतप्रधान मोदी यांना परिषदेपूर्वी सुचविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधाचा हा संकल्प महत्त्वाचा आहे.
उत्तर कोरियाचा निषेध -उत्तर कोरियाने केलेल्या अणू चाचण्यांचा भारतासह ब्रिक्समध्ये निषेध करण्यात आला. या मुद्द्यावर शांततेने आणि मुत्सद्देगिरीने तोडगा काढला जावा, असे मतही व्यक्त करण्यात आले. उत्तर कोरियाने रविवारी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. उत्तर कोरिया नव्या क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत आहे, असा दावा सोमवारी दक्षिण कोरियाने केला आहे.