उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर माँ विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी गेलेली वधू फरार झाल्याची घटना घडली आहे. संबंधित वधूच्या सासरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नवविवाहिता वॉशरूमला जात असल्याचे सांगून गेली होती. पण ती बराच वेळ होऊनही न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. यानंतर वधू, वराची आणि त्याच्या कुटुंबियांची फसवणूक करून प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. यासंदर्भात संबंधित वराने विंध्याचल पोलिसांकडे मदत मागितली होती. सासरच्यांना फसवून वधू फरार... -यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, संबंधित वधू एका रस्त्यावरून लाल रंगाच्या बाईकवर बसून बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वधू उत्तर प्रदेशातील आजम गडची रहिवासी असून जौनपूर येथील एका तरुणासोबत तिचा विवाह झाला होता. महत्वाचे म्हणजे, हा विवाह याच महिन्यात 10 फेब्रुवारीला झाले होते. तसेच, सासरचे लोक दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 19 फेब्रुवारीला माँ विध्यवासिनीच्या दर्शनासाठी गेले होते. येथूनच वधू फरार झाली.
10 रुपये मागून गेली होती वॉशरूमला -संबंधित घटनेसंदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, कुटुंबातील लोक खाण-पाणात व्यस्त होते. याच वेळी संबंधित नववधूने आपल्या पतीकडे सुटे 10 रुपये मागीतले आणि वॉशरूमकडे गेली. यानंतर ती एकटीच मंदीर परिसरातून बाहेर आली. मात्र बराच उशीर होऊनही ती न परतल्याने सासरच्या लोकांनी तिची शोधाशोध सुरू केली, पण ती सापडली नाही. यानंतर, पोलिसांनी केलेल्या तपासातून, ती कुण्या तरुणासोबत बाईकवर बसून फरार झाल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलिसांना कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार दाखल झाल्यास पुढील कारवाई होईल.