उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिल्हिया परिसरात हळदीच्या दिवशी नाचत असताना नववधूच्या भावाचा अचानक मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी मृतदेह घरात ठेवून वरातीचं स्वागत केलं. मिरवणूक आणि लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि नातेवाईकांना निरोप देण्यात आला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
चिल्हिया परिसरातील रहिवासी असलेल्या लोचन गुप्ता यांनी आपल्या मुलीचे लग्न गोरखपूर जिल्ह्यातील सिंघोरवा गावात निश्चित केले होते. 13 मार्च रोजी त्यांचे लग्न होणार होते. सोमवारी सायंकाळी वरात येणार होती आणि दिवसभर वधूच्या हळदीचा विधी सुरू होता. दरम्यान, घरातील होम थिएटरवर संगीत सुरू होते आणि मुले, मुली, महिला नाचत होत्या. वधूचा 19 वर्षांचा भाऊ बैजूही आनंदाने नाचत होता.
नाचत असताना तो अचानक खाली पडला. बैजू पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दुसरीकडे नेण्यास सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आणि मेंदूची नस फुटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
बैजू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गाणं गाणाऱ्या महिलांनी रडू कोसळले. काही वेळातच लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. घटनेनंतर वराच्या बाजूचे लोक काही नातेवाईकांसह घरी पोहोचले. त्यानंतर तेथे लग्नाचे विधी पार पडले. वधूच्या वडिलांनी आपल्या मुलीला आणि नवरदेवाला निरोप दिल्यानंतर बैजूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच वधूला धक्का बसला. ती मृतदेहाजवळ बसून खूप रडत होती आणि भावाला "बाबू, डोळे उघड मी जात आहे" असं म्हणत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"