लग्नानंतर चार दिवसांनी सासरहून माहेरी आलेल्या नववधूचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीय हादरले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण फुफ्फुसात पाणी भरल्याचं सांगण्यात आलं. सध्या व्हिसेरा रिपोर्ट वाट पाहत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली.
नववधूच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नववधू बाथरूममध्ये गेली होती जिथे ती पाण्याच्या ड्रममध्ये पडलेली आढळली. तिला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. व्हिसेरा रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुशवाहा असं वधूचं नाव असून तिचे वय 23 वर्षे होतं. ममताच्या पतीचे नाव सुरेंद्र कुशवाहा आहे. ममताचं माहेर मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, 23 एप्रिल रोजी ममताचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. 24 एप्रिल रोजी पाठवणीनंतर ती सासरच्या घरी गेली
27 एप्रिल रोजी नववधू बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता ती पाण्याच्या टाकीत पडल्याचं दिसलं. तिला तातडीने झाशी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वधूचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढच आहे.
कुटुंबीयांनी सांगितलं की, लग्न होऊन अवघे चार-पाच दिवस झाले होते. हातावरची मेंदीही गेली नव्हती. अनेक विधी अजून व्हायच्या होत्या. याच दरम्यान नववधूचा अचानक मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. गोपीचंद कुशवाहा यांनी सांगितलं की, ममताला उपचारासाठी झाशीला घेऊन जात आहेत. काही वेळाने परत फोन आला आणि डॉक्टरांनी ममता यांना मृत घोषित केल्याची माहिती दिली.