बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून तिची वरात निघणार होती, आता त्याच घरातून अंत्ययात्रा निघाली. लग्नापूर्वी होणाऱ्या एका विधीसाठी अन्न शिजवले जात होते. दरम्यान झोपडीला आग लागली. या आगीमध्ये वधू जवळपास 80 टक्के भाजली होती तर इतरही अनेक जण जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सारण जिल्ह्यातील बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खाबसा गावातील आहे. पैरू महतो यांची मुलगी नीतू कुमारी हिचा विवाह 1 जून (गुरुवार) रोजी होणार होता. घरात लग्नापूर्वीचे विधी केले जात होते. 30 मे रोजी एक विधी पार पडला. त्यासाठी जेवण तयार केले जात होते.
झोपडीसारख्या घरात गॅसवर अन्न बनवत असताना अचानक झोपडीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नीतू आणि इतर कुटुंबीय गंभीर भाजले. भाजलेल्या नववधूला व इतरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 12 लोकांना उपचारासाठी छपरा सदर रुग्णालयात तातडीने आणण्यात आले.
नीतू व्यतिरिक्त, इतर तीन जणांची प्रकृती बिघडल्याने तात्काळ पीएमसीएच पाटणा येथे रेफर करण्यात आले. यामध्ये नीतू कुमारी आणि शेजारच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सीओ, बीडीओ आणि प्रमुखांनी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून त्यांचे सांत्वन केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.