राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावती येथे एका लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होते. सप्तपदी घेतल्यावर सर्व विधी झाल्यानंतर नववधू सासरच्या घरी जात होती. मात्र त्याच दरम्यान धक्कादायक घटना घडली. फतेहपूर जिल्ह्यातून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-65 वर वधू-वरांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली.
भीषण अपघातात वधूचा जागीच मृत्यू झाला तर वर गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील खुशबूचे लग्न राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात झालं होतं. वर नरेंद्र हा सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगडमधील एका गावचा रहिवासी आहे. खुशबू आणि नरेंद्रचं काल रात्री मोठ्या थाटामाटात लग्न झालं.
हिसारहून परतणारी वरात लक्ष्मणगडपासून काही अंतरावर असताना पाली-अंबाला महामार्गाजवळील सालासर रोडवरील मरडाटू चौकात हा अपघात झाला. सासरी पोहोचण्याआधीच नववधूने जगाचा निरोप घेतला. अपघाताची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नववधूचा मृतदेह धानुका रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. वराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सीकर येथे रेफर करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.