पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवानमधील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. येथे एका नववधूने आपल्या लग्नामध्ये मोठमोठ्याने घोषणाबाजी केली आणि सरकारी शाळेत नोकरीची मागणी केली. वधूने 2014 मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिला अद्यापही काम मिळालेलं नाही. त्यामुळे नववधूने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत लग्नातशिक्षकाचीनोकरी देण्याची मागणी केली.
लग्नातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभया रॉय असं या नववधूचे नाव असून ती भटार भागातील रहिवासी आहे. चटनी गावात राहणाऱ्या रिंटू डेसोबत तिचं लग्न झालं आहे. अभयाच्या पतीनेही घोषणा देत पत्नीला साथ दिली. अभया म्हणते की, "आमच्याकडे असा काही खास दिवस नाही. बेरोजगारीची वेदना आहे. मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासारख्या पात्र लोकांना रोजगार देऊन बेरोजगारीचं दुखणं दूर करावे."
अभयाही नियुक्ती आणि नोकरीच्या मागणीसाठी कोलकाता येथील धर्मतळा येथे धरणे धरून बसली होती. अभया रॉयने 2014 साली TET परीक्षा उत्तीर्ण केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ती नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना नोकरीचे आश्वासनही दिले होते. पण, 9 वर्षांनंतरही ती नोकरीसाठी संघर्ष करत आहे. लग्नानंतरही ती लढा सुरूच ठेवणार असल्याचे अभयाचे म्हणणे आहे.
भाजपाचे माजी बर्दवान जिल्हा उपाध्यक्ष मृत्युंजय चंद्र म्हणाले, "या घटनेने राज्यातील शिक्षक भरतीच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकला आहे. शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशीही स्त्रीला हे दु:ख विसरता आले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.