नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेकदा ट्विटरवरुन युजर्सने समस्या मांडल्या त्या समस्येचे निरसन करण्यासाठी सुषमा स्वराज तातडीने पाऊले उचलताना पाहायला मिळालं आहे. मात्र बुधवारी ट्विटरवर सुषमा स्वराज यांचा वेगळा अंदाज दिसून आला.
गरजू लोकांना सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन मदत केल्याची अनेक उदाहरणं आहेत. बुधवारी अशा एका वधूने सुषमा स्वराज यांना ट्विट करत व्हिसा मिळण्यासाठी विलंब होत असल्याने माझं लग्न पुढे ढकललं जात आहे. त्यामुळे मला मदत करा अशी विनंती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना केली.
या मुलीने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, माझ्या सासरची मंडळी, सासू आणि सासरे मला व्हिसा मिळत नसल्याने चिंतेत आहेत. मला व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांना एकदा नाही तर अनेकदा लग्नाचा मुहूर्त टाळावा लागला. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्या लग्नासाठी सासू-सासरे प्रतिक्षा करत आहेत. कृपया मदत करा अशी विनंती केली.
यावर सुषमा स्वराज यांनी विनोदी शैलीत उत्तर देत ट्विटला प्रत्युत्तर केलं की, ओह..मी तुम्हाला भारतीय व्हिसा मिळवून देत तुमच्या सासरच्या मंडळींची मदत करु शकते, त्यामुळे त्यांना लग्नाचा मुहूर्त टाळता येणार नाही
याआधी शनिवारी एका व्यक्तीने ट्विट करत असा आरोप केला होता की, निश्चितच, या सुषमा स्वराज नाहीत ज्या ट्विट करतात, कोणी पीआर व्यक्ती स्वराज यांचे काम सांभाळत असेल त्याला त्याच्या कामाचा पगार दिला जात असेल. यावर सुषमा स्वराज ट्विट करणारी मीच आहे, माझं भूत नाही असं टोला लगावला.