नवरदेवाने मंडपात असं काही केलं त्यानंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जोरदार हाणामारी सुरू झाली, वराची शेरवानी आणि इतरांचेही कपडे फाडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हे संपूर्ण प्रकरण दौसा जिल्ह्यातील नांगल-मीणा गावाशी संबंधित आहे. 1 मे रोजी झुथाहेडा गावातील वीरेंद्र मीना याचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी हा तरुण वरात घेऊन नववधू निशा मीनाच्या गावात पोहोचला होता.
गावातील वधूचे घर अतिशय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते, मंडप व स्टेजही लावण्यात आले होते. फिल्मी आणि राजस्थानी गाण्यांवर डान्स चालू होता. वरानेही शेरवानीमध्ये लग्नमंडपामध्ये प्रवेश केला. वधू-वर पक्षाचे लोक लग्नाचे जेवण जेवत होते. याच दरम्यान, वराला फोन आला आणि त्या फोननंतर वराने आपली पगडी फेकून दिली आणि लग्नास नकार दिला.
मुलाने लग्नास नकार देताच त्याला समजावण्यात आलं. पण तो तयार न झाल्याने थेट मारामारी झाली. लोकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर वधू-वर पक्षाने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच वधूपक्षाने लग्नसमारंभासाठी खर्च केलेली रक्कमही वराने परत द्यावी याविषयी चर्चा झाली. मुलाकडील मंडळी नवरी न घेताच परतले.
वधूपक्षाच्या लोकांनी लग्नासाठी दुसरा मुलगा शोधला आणि नवरीचं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधू निशासोबत लग्न करण्यासाठी दुसरा वरही तयार झाला असून आता पुन्हा वधूच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"