उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये एक वधू नवरदेवाची वाट पाहत होती. 1 मार्च रोजी त्यांचं लग्न होणार होतं. सर्व तयारी झाली होती. मुलीकडची मंडळी आतुरतेने नवरदेवाची वाट पाहत होते. बराच वेळ होऊनही वरात न आल्याने वधूच्या भावाने मुलाच्या वडिलांना फोन करून त्याबाबत विचारणा केली. त्यावर वराच्या वडिलांनी सांगितले की ते तारीख विसरले. आता 10 मार्चला ते वरात घेऊन येणार आहेत, मात्र त्यापूर्वी त्यांना स्विफ्ट डिझायर कार द्यावी लागणार आहे असं म्हटलं. याप्रकरणी तरुणीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हल्दवानी येथील बनभुलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. नवरीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीचे लग्न चमोली जिल्ह्यातील नसीर अहमद यांचा मुलगा समीरसोबत निश्चित झालं होतं. दोघांची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एंगेजमेंट झाली होती. निकाहची तारीख 1 मार्च 2023 ही निश्चित करण्यात आली होती. दोन्हीकडे फोनवर चर्चा झाली. मुलाच्या वडिलांनी दीडशे पाहुणे येणार असल्याचं सांगितलं होतं.
बहिणीच्या लग्नासाठी तरुणाने एक लाख रुपयांचा बँक्वेट हॉल बुक केला. खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या बहिणीला भेट म्हणून देण्यासाठी घरातील सर्व सामानही आपण विकत घेतल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले. पण नवरदेवाकडून स्विफ्ट डिझायर कारची मागणी करण्यात आली. तेव्हा आर्थिक परिस्थितीचे कारण देत कार देण्यास तरुणाने नकार दिला. दोन्ही कुटुंबात चर्चा सुरूच होती.
लग्नाचा दिवस जवळ आला आणि 1 मार्च रोजी वधू पक्षाने सर्व तयारी पूर्ण केली. ते वरातीची वाट पाहत होते. बराच उशीर झाल्यानंतर वधूच्या भावाने नसीर अहमदला फोन केला तेव्हा त्याने तारीख विसरल्याचे सांगितले. आता ते 10 मार्चला वरात घेऊन येणार आहे, मात्र त्यापूर्वी त्याला स्विफ्ट डिझायर कार द्यावी लागणार आहे. वधूच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल करून न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणाने केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"