नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका क्षणांत पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. तेलंगणाच्या विकाराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका नव्या नवरीसह पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह सापडले असून बाकींचा शोध सुरू आहे. नवविवाहित जोडप्यासह सहा जणांना घेऊन जाणारी एक कार रविवारी पुराच्या पाण्यात अडकली. स्थानिक लोकांना नवरदेव नवाज रेड्डी आणि त्याची बहीण राधम्मा यांना कारचा दरवाजा उघडून वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने तीन जणांचे मृतदेह शोधून काढले आहेत. मृतांमध्ये नववधू प्रवालिका, नवरदेवाची बहीण श्रुति आणि ड्रायव्हर रघुवेंद्र रेड्डी यांचा समावेश आहे. तर एका लहान मुलाचा देखील शोध सुरू आहे.
नवाज रेड्डी आणि प्रवालिका यांचं 26 ऑगस्टला लग्न झालं होतं. लग्नानंतर हे नवं जोडपं पहिल्यांदाच रविवारी मोमिनपेट येथे राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे गेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस ते रावुलापल्ली गावातून निघाले होते. मात्र जोरदार पाऊस असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहत होतं. ड्रायव्हरला कार पाण्यातून बाहेर काढता येईल असा विश्वास होता. मात्र तो यात अपयशी ठरला आणि कारसह सर्वच जण पुराच्या पाण्यात अडकले. कारमधील चार जण वाहून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.