जबलपूर-
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. जिथं एका ब्युटिशियनला वधूचा खराब मेकअप करणं भलतंच महागात पडलं आहे. वधूच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार जेव्हा ब्युटी पार्लरच्या संचालिकेला खराब मेकअपची तक्रार केली तेव्हा संचालिकेकडून धमकावण्यात आलं. त्यामुळे वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं व ब्युटी पार्लर विरोधात तक्रार दिली आहे.
कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी ब्युटी पार्लरच्या संचालिकेविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. कोतवाली ठाण्याचे अधिक्षक अनिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ डिसेंबर रोजी एक तरुणीचं लग्न होतं. त्यामुळे मेकअप करण्यासाठी ती मोनिका मेकअप स्टुडिओच्या संचालिका मोनिका पाठक यांच्याशी संपर्क केला होता. मोनिकानं साडेतीन हजार रुपयांत वधूचा मेकअप करण्याचं डील केलं. तीन डिसेंबर रोजी जेव्हा वधू ब्युटी पार्लरला पोहोचले तेव्हा तिथं मोनिका नव्हती. मोनिकानं तिच्या कर्मचाऱ्यांकडून वधूचा मेकअप करुन घेतला आणि तो खराब केला असा वधूचा आरोप आहे. वधूनं मोनिकाला फोन करुन याची माहिती दिली असता ब्युटी पार्लरच्या संचालिकेनं थेट शिवागाळ करण्यास सुरुवात केली. ही माहिती जेव्हा सेन वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा तेही नाराज झाले.
दुसऱ्या दिवशी असोसिएशनचे अधिकारी आणि सदस्य कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. मोनिका पाठक विरोधात तक्रार दाखल केली. अनिल गुप्ता यांच्या माहितीनुसार वधू आणि सेन समाजाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर गांभीर्यानं पोलीस चौकशी करत आहेत.