विषारी दारूमुळे बिहारमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा मृत्यू झाला असून यामुळे राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे. असं असताना आता आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. बेगूसरायमध्ये तब्बल 13 कोटी खर्च करून तयार केलेला पूल कोसळल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे उद्घाटनाआधीच हा पूल कोसळला, पुलाचा काही भाग हा गंडक नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री नाबार्ड योजनेअंतर्गत 206 मीटर लांबीचा पूल तयार करण्यात आला पण अद्याप उद्धाटन करण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी पुलाला तडा गेल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंबंधी 15 डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आलं. मात्र त्यानंतर आज सकाळीच पुलाचा काही भाग हा नदीत कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहेबपूर कमाल पोलीस ठाण्याचा परिसरातील आकृती चौकीपासून बिशनपूरपर्यंत हा पूल तयार करण्यात आला होता.
2016 मध्ये पुलाचं काम सुरू झालं आणि 2017 मध्ये ते पूर्ण झालं. हा पूल बांधण्यासाठी तब्बल 13 कोटी खर्च करण्यात आले. पण काही अडचणींमुळे पुलाचं उद्धाटन होण्यास उशीर झाला आहे. याच दरम्यान रालोजपा नेते संजय यादव यांनी भ्रष्टाचारामुळे पूल कोसळल्याचं म्हटलं आहे. तसेच पुलाला तडा गेल्याची तक्रार करण्यात आली होती. पण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. मात्र आता उद्धाटनाआधीच तो कोसळल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"