नवी दिल्ली: उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढगफुटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. यामुळे भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या प्रवाहातील पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांचे हाल झाले आहेत. यामध्ये २३ जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. सिक्कीममधील आपत्तीचे भयानक फोटो आणि व्हिडिओ सध्या समोर येत आहे.
तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जवळपास ६ पूल कोसळून रस्ते वाहून गेल्याचे दिसून येतंय. लोकांच्या घरात पाणी शिरले असून सर्वत्र गोंधळाच्या वातावरणात बचावकार्यही सुरु आहे. तीस्ता नदीचे पाणी सिंगताम आणि रंगपो सारख्या सखल भागात घुसल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय तिस्ता नदीच्या वाढत्या पाण्यामुळे प्रतिष्ठित इंद्रेणी पूलही वाहून गेला आहे. ते सिंगतम दक्षिण जिल्ह्याला पूर्व सिक्कीममधील आदर्श गावाशी जोडते. दुसरीकडे, सिक्कीममधील अधिकाऱ्यांनी डिक्चू, सिंगताम आणि रंगपो या भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.