नवी दिल्ली - तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांचेही निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लिड्डर यांच्या चितेची आग शांत होत नाही तोच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिड्डर यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांची १७ वर्षांची लेक अशाना लिड्डर हिला तिचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करावे लागले आहे.
ब्रिगेडियर लिड्डर यांची कन्या अशाना लिड्डर हिने म्हटले होते की, मी १७ वर्षांची होणार आहे. मझा वडील माझ्यासोबत १७ वर्षे राहिले. आम्ही त्यांच्या चांगल्या आठवणी सोबत घेऊन पुढे जाऊ. ही एक राष्ट्रीय हानी आहे. माझे वडील माझे चांगले मित्र होते. तसेच ते माझे मित्र होते. ते माझे हीरो होते. ते खूप आनंदी आणि प्रेरणादायी व्यक्ती होते. ते उत्तम मोटिव्हेटर होते.
ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर यांच्या अकाली जाण्याने बसलेल्या धक्क्यातून त्यांचे कुटुंब सावरले नसतानाच सोशल मीडियावर काही ट्रोल्सची नजर लिड्डर यांच्या कन्येच्या ट्विटर अकाऊंटवर पडली. त्यानंतर अशाना हिला तिच्या विचारांसाठी लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे अखेरीस १७ वर्षीय आशाना हिने आपले ट्विटर अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट केले.
दरम्यान, आशानाने ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केल्यानंतर शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. त्या लिहितात की, आशाना ही सध्या केवळ १७ वर्षांची आहे. खूप दु:खातही तिने धैर्य दाखवले आहे. तिने नुकतेच तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले आहेत. ते एक सन्माननीय लष्करी अधिकारी होते. मात्र त्यांच्या कन्येला तिच्या विचारांसाठी ट्रोल केले जात आहे. तिला तिचे अकाऊंट डिलीट करणे भाग पडले आहे. तुम्ही लोक अजून किती खालची पातळी गाठणार आहात, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
लिड्डर यांच्या मुलीला काही लोकांनी ‘woke’ असे नाव दिले आहे. लखीमपूर खेरी येथे जाताना काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा झाडू मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आशना हिने ट्विट करून सीएम योगींवर निशाणा साधला होता.