लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लैंगिक छळाच्या आरोपाला सामोरे जात असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात. या प्रकरणी दिल्ली पोलिसांना चार साक्षीदार मिळाले असून, त्यांनी ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची आपल्याला कल्पना असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या साक्षीदारांत ऑलिम्पिक व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या दोन महिला कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय पंच व राज्य स्तरावरील प्रशिक्षकाचा समावेश आहे.
पोलिस या प्रकरणी हरयाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकमध्ये तपास करीत आहेत. दरम्यान, केंद्राने आंदोलक कुस्तीपटूंच्या पाच मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु ते ब्रिजभूषण यांना अटक करणे व त्यांना कुस्ती महासंघातून पूर्णपणे बाजूला करण्यास राजी नाहीत.
मंत्र्यांची समिती कुस्तीपटूंशी बोलणार
कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासाठी केंद्र चार मंत्र्यांची समिती तयार करीत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशिवाय एक महिला मंत्री आणि दोन अन्य मंत्र्यांचा यात समावेश असेल.
काय सांगितले?
- दोन साक्षीदार महिला कुस्तीपटू आहेत. एक ऑलिम्पिकपटू असून, दुसरीने राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. ब्रिजभूषण यांच्या कृत्याची माहिती पीडित महिला कुस्तीपटूंकडून मिळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
- महिला कुस्तीपटूंचा प्रशिक्षक असलेल्या तिसऱ्या साक्षीदाराने सांगितले की, ब्रिजभूषण यांनी शरीरसुखाची मागणी केल्यानंतर सहा तासांनी पीडितेने फोन करून याची माहिती दिली होती.
- चौथे साक्षीदार आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी सांगितले की, ते जेव्हा स्पर्धांसाठी जायचे तेव्हा त्यांना महिला कुस्तीपटूंकडून ही समस्या ऐकायला मिळायची.