'हिम्मत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा', ब्रिजभूषण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 08:47 PM2023-07-12T20:47:21+5:302023-07-12T20:48:04+5:30
Brij Bhushan On Priyanka Gandhi: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रियंका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
Brij Bhushan On Priyanka Gandhi: भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ब्रिजभूषण यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आता ब्रिजभूषण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ब्रिजभूषण यांनी ट्विट केले की, "प्रियांका गांधी आणि काँग्रेसचा न्यायालयावर विश्वास नाही, त्यामुळे ते प्रत्येक प्रकरणाची मीडिया ट्रायल घेतात. काँग्रेसने नेहमीच माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध कट रचला, ज्याची काही उदाहरणे सर्वांसमोर आहेत. प्रियांका गांधी आणि त्यांच्या पक्षाने खोट्याच्या आधारे राजकारण करण्याची स्वप्ने पाहणे बंद केली पाहिजे. सत्याचा नेहमीच विजय होतो आणि प्रियंका गांधींना खोट्यासमोर सत्य किती भारी पडते हे पहायचे असेल, तर ट्विट करणे बंद करा आणि माझ्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे धाडस करा."
ब्रिजभूषण यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
ब्रिजभूषण यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले की, "चंद्रमण शरण सिंह हे माझे बाबा होते आणि 1952 मध्ये ते काँग्रेस पक्षाचे आमदार होते. गूढ परिस्थितीत त्यांचा रुग्णालयात मृत्यू होणे, हा काँग्रेसचा कट होता. 1974 मध्ये माझे घर पाडण्यात आले आणि मी आणि माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले होते. तेव्हा काँग्रेस सत्तेत होता. 1975 मध्ये आणीबाणीला विरोध केल्यामुळे काँग्रेस मला पूर्वांचलमधील त्यांच्या अस्तित्वाला आव्हान मानतो. त्यामुळेच 1980 च्या दशकात माझ्यावर काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरुन तीन डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते."
लैंगिक छळाच्या आरोपांचे काय?
महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबाबत ते म्हणाले, "2023 मध्ये रचलेल्या कटात संपूर्ण काँग्रेस पक्ष सामील आहे. या कटाचे नेतृत्व प्रियंका गांधी, भूपेंद्र हुडा यांसारख्या लोकांच्या हाती आहे. त्यामुळे मी प्रियंका गांधींना विचारतो की, त्यांचा मीडिया ट्रायलवर विश्वास आहे की, न्यायालयीन कामकाजावर विश्वास आहे? माझा देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि न्यायालयावर विश्वास आहे."
प्रियांका गांधी यांचे वक्तव्य
प्रियांका गांधी यांनी ट्विट केले होते की, "कायदा आणि नैतिकता सांगते की, महिलांवरील अत्याचाराच्या आरोपीला त्यांच्या पदावरून हटवले पाहिजे, निष्पक्ष तपास झाला पाहिजे, अटक झाली पाहिजे आणि त्याला न्यायालयात शिक्षा झाली पाहिजे. भाजप सरकारमध्ये देशाची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणारे प्रकरण दाबले जात आहे. या प्रकरणात दबाव आणला जात आहे. यावर सरकार गप्प आहे. आरोपी अजूनही भाजपमध्ये का आहे आणि कारवाई का झाली नाही?" असा सवाल केला होता.