Brij Bhushan Sharan Singh Case:कुस्तीपटू vs ब्रिजभूषण सिंह वाद अद्याप मिटलेला नाही. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (9 जून) कुस्तीपटू संगीता फोगटला कुस्ती महासंघाच्या कार्यालयात आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या सरकारी निवासस्थानी नेले. रुटीन चौकशीसाठी संगीताला तिथे नेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यावरुन विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी पुन्हा एकदा ब्रिजभूषण सिंह यांच्यावर टीका केली आहे.
विनेश फोगाट काय म्हणाली?विनेश फोगाटने ट्विट केले की, 'ही ब्रिजभूषण यांची ताकद आहे. ते आपली मसल पॉवर, राजकीय ताकद आणि खोटं बोलून महिला कुस्तीपटूंना त्रास देण्यात गुंतले आहेत, त्यामुळे त्यांची अटक गरजेची आहे. पोलिसांनी आम्हाला तोडण्याऐवजी त्यांना अटक केली तर न्याय मिळण्याची आशा वाढेल, अन्यथा नाही.' महिला कुस्तीपटू पोलीस तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी गेल्या होत्या, मात्र त्या तडजोडीसाठी गेल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.
बजरंग पुनिया काय म्हणाला?
बजरंग पुनिया यानेही ट्विट केले की, 'महिला कुस्तीपटू पोलिस तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी गेली, परंतु ती तडजोड करण्यासाठी गेल्याचे मीडियामध्ये दाखवले. ही ब्रिजभूषणची शक्ती आहे. तो मसल पॉवर, राजकीय ताकद आणि खोटं बोलून महिला कुस्तीपटूंना त्रास देतोय. त्याची अटक आवश्यक आहे. पोलीस आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.'
दिल्ली पोलिसांनी काय सांगितले?महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर दुपारी 1.30 च्या सुमारास महिला अधिकारी संगीता फोगटसोबत ब्रिजभूषण यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी पोहोचल्या. जवळपास अर्धा तास ते तिथेच थांबले. त्यांनी फोगट यांना घटना सांगण्यास सांगितले आणि छळ झालेल्या ठिकाणांची माहिती घेतली.