Brij Bhushan Singh News: महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याप्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह न्यायालयासमोर हजर झाले. ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांविषयी न्यायालयाकडून माहिती देण्यात आली. या सुनावणीवेळी न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांना तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का, असा सरळ सवाल केला. यावर ब्रिजभूषण सिंह यांनी नकारार्थी उत्तर दिले.
चूक मान्य करण्याचा काही प्रश्नच येत नाही. कोणतीही चूक केली नाही, त्यामुळे ती मान्य का करावी, असे उत्तर ब्रिजभूषण सिंह यांनी दिले. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी आणि कुस्ती संघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनीही आरोप फेटाळून लावले. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आम्ही कधी कुणाला घरी बोलावले नाही. धमकावले नाही. सगळे आरोप खोटे आहेत, असे विनोद तोमर यांनी सांगितले.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी कलम ३५४, कलम ३५४-अ आणि कलम ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. तसेच, या प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह ३० हून अधिक कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे निर्देश यापूर्वीच न्यायालयाने दिले होते. यातील ६ पैकी ५ प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पुरेसे पुरावे मिळाले आहेत. ५ प्रकरणांत आयपीसी कलम ३५४ आणि ३५४डी या अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सहावे प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच या कलमांतर्गत आरोप सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते. दंडही केला जाऊ शकतो. दुसऱ्यांदा याच कलमात दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.