Wrestlers Protest: गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंनीब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, काल पैलवानांनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आता आज (8 जून) या प्रकरणात नवीन वळण आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सूडाच्या भावनेने त्यांनी WFI प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, आता चूक सुधारायची आहे. कोर्टात नाही तर आताच सत्य बाहेर यावे अशी त्यांची इच्छा आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पीटीआयला सांगितले की, सरकारने गेल्या वर्षी झालेल्या चाचणीत त्यांच्या मुलीच्या पराभवाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे, म्हणूनच त्यांनी सत्य समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले अल्पवयीन मुलीचे वडील?अल्पवयीन मुलीच्या वडिलांनीही त्यांच्या आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातल्या कटुतेवर प्रतिक्रिया दिली. याची सुरुवात 2022 मध्ये लखनौ येथे झालेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीपासून झाली, ज्यामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी भारतीय संघात प्रवेश करू शकली नाही. रेफ्रींच्या निर्णयासाठी त्यांनी ब्रिजभूषण यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, “मी सूडाच्या भावनेने भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एका वर्षाची मेहनत रेफरीच्या निर्णयामुळे वाया गेली. मी बदला घेण्याचे ठरवले आणि याच सूडाच्या भावनेने खोटी तक्रार दिली."
बैठकीनंतर पैलवान आणि सरकार काय म्हणाले?आंदोलक कुस्तीपटूंसोबतची सहा तास चाललेली बैठक सकारात्मक असल्याचे सांगून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सांगितले. ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बैठकीनंतर सांगितले की, त्यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही, केवळ सरकारच्या विनंतीवरुन त्यांचे आंदोलन 15 जूनपर्यंत पुढे ढकलले आहे.