"काँग्रेसचा सत्यानाश केला"; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:30 PM2024-10-08T15:30:12+5:302024-10-08T15:31:35+5:30

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Brijbhushan Sharan Singh has reacted after Vinesh Phogat's victory in the Haryana assembly elections. | "काँग्रेसचा सत्यानाश केला"; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

"काँग्रेसचा सत्यानाश केला"; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

Vinesh Phogat Haryana Election Result 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सर्वांच्या नजरा हरयाणातील जुलाना विधानसभेकडे होत्या. कारण काँग्रेसने ऑलिम्पियन विनेश फोगट यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर विनेश फोगटने विजय मिळवला आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाने योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. मात्र विनेशने योगेश बैरागी यांना आस्मान दाखवत विजय मिळवला. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ही जागा जिंकली होती. यंदा मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि विनेश निवडून आली. विनेशच्या विजयावर भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगटचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून विनेशने निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. या निकालाबाबत भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या, कुस्तीपटूंच्या नावावर लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो जनतेने फेटाळून लावल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच विनेश जिंकली असली तरी काँग्रेसचा सत्यानाश झाला असल्याचेही ब्रिजभूषण म्हणाले.

काँग्रेसचा सत्यानाश कशामुळे झाला, असे विचारले असता? ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विनेश फोगटचे नाव न घेता तिच्याकडे बोट दाखवले. "तिचे (विनेशचे) काय आहे, ती नक्कीच जिंकेल. ती इथेही (कुस्ती) बेईमानीने जिंकायची आणि आता तिथेही जिंकली. मात्र त्या विजयाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. ही विजेती कुस्तीपटू हिरो नसून खलनायक आहे," असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विनेश फोगटने पहिलीच निवडणूक ६०१५ मतांनी जिंकली आहे. तर भाजपचे योगेश कुमार ५९०६५ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या निवडणुकीत विनोद यांना ६५०८० मते मिळाली.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक कनिष्ठ महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर गेल्या वर्षी दिल्लीतील जंतरमंतरवर विनेशने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. कुस्तीपटूंच्या आरोपानंतर भारतीय कुस्ती विश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या मुलाला लोकसभा उमेदवारी दिली होती. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे.

Web Title: Brijbhushan Sharan Singh has reacted after Vinesh Phogat's victory in the Haryana assembly elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.