नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जबाब नोंदविला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी डब्ल्यूएफआयचे सहायक सचिव विनोद तोमर यांचाही जबाब नोंदविला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सिंह यांना चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात त्यांची जवळपास तीन तास चौकशी करण्यात आली.
भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रमुखावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून अनेक कुस्तीपटू जंतर-मंतरवर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
‘एसआयटी’ची स्थापना
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाला दिली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांच्या न्यायालयात पोलिसांनी ही माहिती दिली. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी ठेवली आहे.
लैंगिक अत्याचार केल्याचा आहे आरोप
कुस्तीपटूंच्या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. आंदोलक कुस्तीपटू सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. सिंह यांनी एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांचा आरोप आहे.