उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कैसरगंज येथील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. एबीपी न्यूजशी दूरध्वनीवरून संवाद साधताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, विनेश निवडणूक हरणार आहे.
एबीपी न्यूजला दिलेल्या आपल्या याआधीच्या मुलाखतीचा संदर्भ देत भाजपा नेत्याने सांगितलं की, "ऑलिम्पिकमधील अपयशासाठी भाजपा आणि मोदी सरकारला कसं जबाबदार धरायचं याची स्क्रिप्ट काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी लिहिणं बाकी आहे, असं मी मुलाखतीत म्हटलं होतं. मी जे बोललो ते खरं ठरलं."
"विनेश आणि बजरंग यांना राहुल आणि काँग्रेसकडून स्क्रिप्ट मिळाल्या होत्या आणि त्यांच्या इशाऱ्यानुसार भाजपावर आरोप केले गेले. विनेशला आरोप करण्याची सवय आहे. विनेश आपल्या पराभवासाठी नेहमीच इतरांना दोष देत आली आहे. ती दोष देण्यात माहिर आहे. विनेश राहुल गांधींच्या सूचनेनुसार काम करत आहेत. विनेशने कुस्तीला बदनाम केलं आहे."
काँग्रेसबाबत ब्रिजभूषण यांनी दावा केला की, "विनेश आणि बजरंग यांचा काँग्रेसमध्ये समावेश केल्याने काँग्रेसला पश्चाताप होईल. विनेश आणि बजरंगने कुस्तीला बदनाम केलं आहे. काँग्रेस विनेशचा वापर करत आहे. विनेश आणि बजरंग यांना हरियाणा निवडणूक जिंकण्यासाठी मोहरा बनलं जात आहे."