'आता माझा कुस्तीशी संबंध नाही...', सरकारच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 03:30 PM2023-12-24T15:30:29+5:302023-12-24T15:33:18+5:30

क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह पहिल्यांदाच बोलले.

Brijbhushan sharan singh wrestling sakshi malik bajarang punia, Brijbhushan's first reaction after the government's decision | 'आता माझा कुस्तीशी संबंध नाही...', सरकारच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया

'आता माझा कुस्तीशी संबंध नाही...', सरकारच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: तीन दिवसांपू्र्वीच भारतीय कुस्ती महासंघाची (WFI) निवडणूक पार पडली. पण, क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले. यानंतर WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नड्डांची भेट घेतल्यानंतर ब्रिजभूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

पत्रकार परिषदेत ब्रिजभूषण यांनी सांगितले की, तरुण पैलवानांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून स्पर्धेचे आयोजन करायचे होते. आता सरकारने हवं त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करावी. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो निवडून आलेल्या लोकांनी घ्यावा. मी 12 वर्षे कुस्ती खेळली, आता माझा कुस्तीशी संबंध नाही. मी फार पूर्वीच कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती आयोजित करावी, अन्यथा मुलांचे एक वर्ष वाया जाईल,' असं ब्रिजभूषण म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'पहिल्या दिवसापासून या प्रकरणावर राजकारण सुरू आहे. यामध्ये काँग्रेस आणि तुकडे-तुकडे टोळीचा सहभाग आहे. माझे घर अयोध्येत आहे. एवढ्या कमी वेळात इतरत्र कुठेही तयारी करणे शक्य नसल्याने नंदिनी नगरमध्ये स्पर्धा आयोजित केली होती. संजय सिंह भूमिहार आणि मी राजपूत आहे, आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत. लैंगिक शोषणाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यावर आता काहीही बोलणार नाही.'

जेपी नड्डा यांच्या भेटीबाबत ब्रिजभूषण म्हणाले, 'निवडणुका येत आहेत, मी कधीही कोणालाही भेटू शकतो. नड्डाजी आमचे नेते आहेत, त्यांना भेटत राहणार. लोकसभा निवडणुकीमुळे माझ्याकडे आधीच खूप काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह माझे नेते आहेत, लोकसभा निवडणुकीत मोदींचे सरकार स्थापन होणार,' असंही ते यावेळी म्हणाले.

क्रीडा मंत्रालयाने का घेतला निर्णय?

कुस्ती महासंघाची यंदाची निवडणूक वादात सापडली होती. ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. गंभीर आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासारखाच असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याचीच निवड झाल्याने मी कुस्तीतून कायमची बाहेर पडत असल्याचं सांगत साक्षी मलिकने आपला संताप व्यक्त केला होता.

साक्षीच्या या भूमिकेची देशभरात चर्चा झाल्याने सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. त्यातच कुस्ती महासंघाच्या निवनियुक्त अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच एक वादग्रस्त निर्णय घेतला. ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप गोंडा येथे आयोजित करण्याचा निर्णय कुस्ती महासंघाकडून घेण्यात आला होता. मात्र कुस्ती महासंघाच्या संविधानातील तरतुदींचे पालन न करता हा निर्णय घेण्यात आल्याचं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. या निर्णयातून अध्यक्षांची मनमानी दिसून येत असल्याचंही क्रीडा मंत्रालयाने म्हटलं असून संजय सिंह यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

 

Web Title: Brijbhushan sharan singh wrestling sakshi malik bajarang punia, Brijbhushan's first reaction after the government's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.