यदु जोशी
गांधीनगर : मतदानाला येताना तुमच्याकडील पाळीव प्राणी घेऊन या, तुम्ही मतदान करत असताना त्यांची तिकडे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल; गरज वाटली तर उपचारदेखील केले जातील. असे एक ना अनेक फंडे सध्या गुजरातमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी वापरले जात आहेत.
जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी यासाठी ही शक्कल शोधली आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रांवर नेऊ शकता. केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी ‘अवसर’ म्हणजे ऑल व्होटर्स स्पिरिटेड, अवेअर अँड रिस्पॉन्सिबल’ अशी एक मोहीम हाती घेतली. गांधीनगरमधील त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. २०१७ मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले, ते वाढावे हे ध्येय समोर ठेवले.
‘त्यांच्या’ मतदानाला सुरुवात८० वर्षे वयांवरील वृद्ध महिला-पुरुष आणि बहुविकलांग यांच्या मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणूक यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करवून घेत आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी, पोलीस, व्हिडीओग्राफर यांच्या उपस्थितीत हे मतदान करविले जाते.
बिलात सवलत मिळवाअमूल हा गुजरातमधील दुधाचा सर्वांत मोठा ब्रँड. अमूलच्या प्रत्येक दूध पिशवीवर मतदानाचे आवाहन करणारा मजकूर आहे. औषध विक्रेते दुकानदार, हॉटेलवाले बिलांवर तसे आवाहन करणारा मजकूर छापतात. ‘मतदान करा, बिलात सवलत मिळवा’ असा फंडाही काहींनी काढला आहे.
गुजरातमध्ये अभूतपूर्व मतदान व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याला भरभरून प्रतिसाद मिळेल, हा विश्वास आहे.- पी. भारती, मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात.
जाओ उन की साइन लेकर आओ... -- राज्यातील ९३ लाख शालेय विद्यार्थ्यांना ‘आम्ही सर्व कुटुंबीय मतदान करणार’ असा मथळा असलेली शपथपत्रे देण्यात आली. - ती त्यांनी पालकांकडून भरून आणायची होती. ८४ लाख जणांनी ही शपथपत्रे भरून आणली.