इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी पाकिस्तानी संसदेत केली. इम्रान खान यांची ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जात असून, भारताचा तसेच आंतरराष्ट्रीय दबाव यांमुळेच पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांची सुटका होणार असल्याच्या वृत्ताने भारतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानी संसदेत दोन देशांतील तणावाबाबत सविस्तर निवेदन केल्यानंतर इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका करण्यात येईल, असे जाहीर केले. अभिनंदन यांना उद्या लाहोरला नेण्यात येणार असून, तेथून पंजाबमधील वाघा बॉर्डरवर आणले जाईल. तेथे त्यांचा ताबा भारताकडे देण्यात येईल. इम्रान खान म्हणाले की, भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. दुसरीकडे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता.
अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारतापुढे शांततेचा प्रस्ताव ठेवला. तसेच पंतप्रधान मोदी यांना बुधवारी संध्याकाळी फोन केला. पण मोदी यांनी त्यांचा फोन घेतला नाही. आधी अभिनंदन यांची सुटका व नंतरच चर्चा वा वाटाघाटी होतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. मुख्य म्हणजे एरवी भारताबाबत अतिशय शत्रुत्वाची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी लष्करानेही अभिनंदन यांच्या सुटकेबाबत इम्रान खान यांनीच निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या इतिहासात बहुधा प्रथमच तेथील लष्कराने भारतासंदर्भात लोकनियुक्त सरकारला काही निर्णय घेण्याची मुभा दिली असावी. कदाचित भारताशी वैर परवडणारे नाही, याचा अंदाज तेथील लष्करालाही आला असावा. अभिनंदन यांची सुटका न केल्यास आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा इशाराच भारताने दिला होता.हा कमकुवतपणा समजू नका - इम्रानइम्रान खान संसदेत म्हणाले की, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही भारतीय वैमानिकाची उद्या सुटका करणार आहोत, मात्र आमच्या या पावलाला कोणी पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. भारत व पाकिस्तानमधील तणावाचे मूळ काश्मीर आहे. भारतही दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करताना त्यांनी श्रीलंकेतील तामिळ वाघांचा उल्लेख केला.