नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणा; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:59 AM2024-07-03T08:59:10+5:302024-07-03T08:59:33+5:30
गेल्या सात वर्षांत प्रश्नपत्रिका फुटण्याचे ७० प्रकार घडले असून, त्याचा सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला आहे.
नवी दिल्ली - वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-यूजी परीक्षेबाबत लोकसभेमध्ये उद्या, बुधवारी चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्या सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी एक पत्र लिहून केली आहे.
नीट-यूजी परीक्षेबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा घडवून आणावी ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी २८ जून रोजी, तसेच १ जुलै रोजी अमान्य करण्यात आली होती. नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारशी मी संवाद साधणार असल्याचे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले होते. त्याची आठवण राहुल गांधी यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न नीट-यूजी परीक्षेशी निगडित आहे. त्या परीक्षेतील गैरप्रकारांमुळे आपल्या उच्च शिक्षणातील त्रुटी उघड झाल्या आहेत. गेल्या सात वर्षांत प्रश्नपत्रिका फुटण्याचे ७० प्रकार घडले असून, त्याचा सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला आहे.
नीट-पीजी परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या मध्यास?
यंदा नीट-पीजी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्याच्या मध्याला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या परीक्षेची सुधारित तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन (एफएमजीइ) ६ जुलै रोजी होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली.