हरिद्वार: विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकावर दबाव निर्माण केला आहे. यापाठोपाठ आता रामदेव बाबांनीदेखील सरकारला इशारा दिला आहे. लोकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे सरकारनं राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करावा, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. सरकारनं कायदा न केल्यास लोक स्वत: मंदिराची उभारणी सुरु करतील आणि त्यामुळे देशातील वातावरण बिघडेल, असा इशारादेखील त्यांनी दिला. ते हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राम मंदिराच्या उभारणीची वाट पाहणाऱ्या लोकांचा संयम आता संपत आला आहे. राम मंदिरासाठी आता सरकारनं कायदा करावा. अन्यथा लोक स्वत:च राम मंदिर बांधण्यास सुरुवात करतील. असं घडल्यास देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा सूचक इशारा रामदेव बाबांनी सरकारला दिला. सध्या देशात कोणीच भगवान रामाच्या विरोधात नाही. देशातील सर्व हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव त्यांचेच वंशज आहेत, असंही ते पुढे म्हणाले. राम मंदिर न उभारल्यास देशातील परिस्थिती बिघडेल, असा इशारा आधीदेखील रामदेव बाबांनी दिला होता. 'राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता सर्वोच्च न्यायालयातून नव्हे, तर संसदेतून जातो. त्यामुळे सरकारनं यासाठी पुढाकार घ्यायला हवा. लोकांचा संयम संपत आला आहे. आता ते फार काळ मंदिरासाठी वाट पाहू शकत नाहीत,' असं रामदेव बाबांनी मुझफ्फरनगरमध्ये म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त आणि रामभक्त असल्याचंदेखील ते म्हणाले होते.
Ayodhya Ram Mandir: कायदा करा, अन्यथा...; रामदेव बाबांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:50 PM