नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये अडकून पडलेल्या ५६ भारतीय गर्भवती परिचारिकांना देशात परत आणण्याचे आदेश केंद्रीय परराष्ट्र खात्याला द्यावे, असे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियात अडकलेल्या ५६ गर्भवती परिचारिकांचा दुसरा किंवा तिसरा महिना सुरू आहे. अशात त्यांना उपचार आणि मानसिक तसेच सामाजिक आधाराची गरज आहे. केंद्र सरकारने आपल्या ‘वंदे भारत अभियाना’च्या पुढील टप्प्यात त्यांना सामावून घ्यावे.तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या घटकाला या अभियानात प्राधान्य द्यायला हवे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. परिचारिकांच्या संयुक्त संघटनांनी मिळून ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली व सोमवारी त्यावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सुभाष चंद्रन बाजू मांडणार आहेत. सौदी अरेबियात अडकलेल्या महिलांना कुटुंबासह राहण्याचा व्हिसा मिळालेला नाही, त्या तिथे एकट्याच राहतात. अशा वेळी त्यांची काळजी घेण्यासाठीही सोबत कुणी नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.19-23 मे या कालावधीत केंद्र सरकारचा वंदे भारत अभियानाचा दुसरा टप्पा निश्चित केला गेला आहे. याच कालावधीत सर्व गर्भवती परिचारिकांना भारतात परत आणावे, याचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.
गर्भवती परिचारिकांना सौदी अरेबियातून परत आणा, उच्च न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 1:22 AM