नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू एवढी क्षमता आमच्याकडे आहे, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत महत्वाच्या आघाड्या करण्याची शक्यता नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लल्लू म्हणाले, “ समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षासोबत युती वा आघाडी न करता आम्ही निवडणूक लढवू व स्वबळावर सरकार स्थापन करू.”पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या देखरेखीखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल आणि राज्यात तीन दशकांपासून सत्तेपासून दूर राहिलेला काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येईल” असे ते म्हणाले. वृत्तसंस्थेला रविवारी दिलेल्या मुलाखतीत लल्लू म्हणाले, दडपशाही करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला मुख्य आव्हान म्हणून काँग्रेस समोर आला आहे आणि ४०३ सदस्यांच्या विधानसभेत समाजवादी पक्षाच्या ४९ आमदारांच्या तुलनेत फक्त पाच आमदार असलेला काँग्रेस पक्ष अधिक परिणामकारक विरोधी पक्ष म्हणून सिद्ध झाला आहे.
राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत- राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत. ‘बदलाव की आंधी है, जिसका नाम प्रियांका गांधी है’, असे सांगून लल्लू म्हणाले की, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना ही वेगवेगळ्या पातळ्यांवर बळकट झाली आहे. - आगामी निवडणूकीत प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले जाईल का असे विचारता अजय कुमार लल्लू म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते घेतील. - या निवडणुकीत प्रियांका गांधी या पक्षाचा चेहरा असतील का, असे विचारल्यावर लल्लू म्हणाले, प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या प्रभारी असून निवडणूक त्यांच्या देखरेखीखाली लढवली जाईल.