नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा हिंसाचार झालेला पाहायला मिळाला. या हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात राकेत टिकैत शेतकऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन रॅलीत येण्यास सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली असून, राकेश टिकैत शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप केला जात आहे.
राकेश टिकैत काय म्हणाले?
या व्हिडिओमध्ये राकेश टिकैत म्हणाले की, सरकार काही झाले तरी ऐकत नाही. आडमुठेपणा करत आहे. आपला झेंडा घेऊन या. झेंडाही आणायचा आहे. लाठ्या-काठ्याही आणायच्या आहेत. सर्व गोष्टी समजून जा. तिरंगाही लावायचा आहे, आपला झेंडाही लावायचा आहे. आता सर्वांनी यायचे आहे. आपल्या जमिनी वाचत नाही. आपल्या जमिनी वाचवायचा सर्वांनी या. अन्यथा जमिनी वाचणार नाहीत. जमिनी हिसकावून घेतल्या जातील, असे राकेश टिकैत या व्हिडिओमध्ये सांगताना पाहायला मिळत आहेत.
काठ्या शस्त्र नाहीत - राकेश टिकैत
राकेश टिकैत यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना राकेश टिकैत म्हणाले की, हा व्हिडिओ माझाच आहे, हे मी स्वीकारतो. मात्र, काठ्या हे काही शस्त्र नाही. काठीशिवाय झेंडा कसा लावणार. झेंडा लावण्यासाठी काठ्या आणायला सांगितल्या होत्या, असे राकेश टिकैत यानी स्पष्ट केले.
हिंसाचारात सामील असलेल्यांवर कारवाई करणार
ज्या व्यक्तीने झेंडा फडकावला, ती कोण होती? एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काही लोकांना भडकवण्यात आले आहे. त्यांना आंदोलन सोडावे लागेल. ज्या व्यक्तींचा हिंसाचाराशी संबंध असल्याचे सिद्ध होईल, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे राकेत टिकैत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नाहीतर अनेक आंदोलकांनी पोलिसांना मारण्याचाही प्रयत्न केला. रात्री उशीरा सर्व आंदोलकांना लाल किल्ल्यावरून बाहेर काढण्यात आले.
राजधानी दिल्लीतील हिंसाचारानंतर कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांसोबत 'सीआरपीएफ'च्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात सुमारे ३०० पोलीस जखमी झाले असून, या संपूर्ण प्रकरणानंतर २२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.