नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा केलेला अपमान, सूरतच्या न्यायालयाकडून दोन वर्षांची ठोठावलेली शिक्षा, लगेचच दिलेला जामीन आणि यानंतर रद्द केलेली खासदारकी यावरून काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. देशभरात भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात टीकेची झोड उठवण्यात येत असून, भाजपकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन, मोदी सरकार मला घाबरलं असून मी अदानी प्रकरणी संसदेत आवाज उठवल्याने पंतप्रधान घाबरल्याचं राहुल यांनी म्हटलं. यावेळी, एका पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल गांधी भडकले होते. त्या पत्रकारास राहुल यांनी भाजपसोबत जाण्याचा सल्लाही दिला.
राहुल गांधींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, तुम्ही देशातील ओबीसींचा अपमान केलाय? असा आरोप भाजप नेते करत आहेत. त्यावर, राहुल यांनी उत्तर देताना पत्रकारावर संताप व्यक्त केला. तुम्ही थेट भाजपला बिल्ला लावून या, पत्रकार बनून कशाला आला आहात, असे राहुल यांनी म्हटले. ''भैय्या देखिए, पहिले आपका अटेम्ट यहाँ से आया, फिर वहाँ से आया... अब यहाँ से आ रहे हो? डायरेक्टली बीजेपी के लिए काम क्यों कर रहे हो? थोडी डिस्कशन करो, थोडे घुमघाम कर पुछो, आपको ऑर्डर दिया है क्या... देखो मुस्कुरा रहे हो, अगर बीजेपी के लिए काम करना चाहते हो तो उसका झंडा छाती पर लगा लो, फिर मै उसी तरस से जबाव दुँगा'' असे राहुल यांनी भरपत्रकार परिषदेत म्हटलं.
दरम्यान, कोर्टाने दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आल्याप्रकरणी राहुल गांधींना एक प्रश्न पत्रकाराकडून विचारण्यात आला. त्यावर, हा ओबीसीचा विषयच नाही, तर मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा विषय आहे. अदानींच्या अकाऊंटमध्ये २० हजार कोटी रुपये आले कुठून? या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही. ही माझी तपस्या आहे, माझ्या आयुष्याची तपस्या आहे. मला तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण मी माझी तपस्या करतच राहणार. माझ्या पुढील भाषणाने पंतप्रधान घाबरत आहेत, जे मी अदानीवरच करणार होतो. त्यामुळेच माझं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय, असेही राहुल यांनी म्हटलं.