ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. महत्वाचं म्हणजे आपण पुर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असतो. अगदी फोन करण्यापासून ते मोठे व्यवहार करण्यापर्यंत सर्व काही एका स्मार्टफोनवरुन करता येत. नेमकं याचमुळे स्मार्टफोन खिशात असणं म्हणजे स्मार्ट असण्याचं लक्षण समजलं जातं. मात्र याची दुसरी बाजूही आहे जी सर्वांसाठी धोकादायक आहे. स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्याला वृद्धावस्थेकडे घेऊन जात आहे. स्मार्टफोनमुळे तरुणपणातच लोक 80 वर्षाच्या म्हाता-याप्रमाणे चालू, वागू लागतात. सोबतच शारिरीक आजारही उद्भवत आहे. यामध्ये सर्वात जास्त कंबर आणि मानेच्या वेदनेचा समावेश आहे.
वैज्ञानिकांनी 21 जणांवर सर्व्हे केला. सर्व्हे करताना सर्वांवर आय ट्रॅकरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांच्या 252 हालचालींचं निरीक्षण करण्यात आलं. सर्व्हे करत असताना 46 टक्के लोक चालताना स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं लक्षात आलं. मेसेज वाचायचा असो किंवा टाईप करायचा असो, तसंच फोनवर बोलताना लोक स्मार्टफोनचा वापर करत होते. चालताना स्मार्टफोनचा वापर केल्यास चालण्याचा वेग कमी होतो, आणि एखाद्या 80 वर्षाच्या म्हाता-याप्राणे लोक चालू लागतात.
संशोधक डॉ टिमिस यांनी सांगितलं की, सर्व्हे करत असताना एका व्यक्तीला पाहिलं असता ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ती व्यक्ती माझ्या पुढे चालत होती तेव्ही तो दारु पिऊन चालत असावा असा मला संशय आला. मात्र मी पुढे जाऊन पाहिलं तर तो चालता चालता स्मार्टफोनचा वापर करत होता.
जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची आकडेवारी पाहता अनेक देशांनी स्मार्टफोन युजर्सना वेगवेगळ्या सुविधा देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजे सांगायचंच झालं तर, चीनमध्ये अशा लोकांसाठी खास वेगळा फूटपाथच तयार करण्यात आला आहे. जेणेकरुन स्मार्टफोन युजरला चालताना कोणताही त्रास होणार नाही. तर नेदरलँडमध्येही अशाच प्रकारची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर प्लस वनने केलेल्या सर्व्हेत स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये दुरावा येत असल्याचं समोर आलं होतं. जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने अनेक नाती संपत असल्याचं सर्व्हेत सांगण्यात आलं होतं.