कोलकाता : भारतावर २०० वर्षे एक वसाहत म्हणून जुलमी शासन करताना ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.कोलकाता साहित्य महोत्सवाचे उद््घाटन करण्यापूर्वी थरूर स्वत:च्याच ‘अॅम इरा आॅफ डार्कनेस: दि ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाविषयी बोलत होते. या पुस्तकाच्या ब्रिटिश आवृत्तीचे येत्या २ मार्च रोजी प्रकाशन व्हायचे आहे.जुलमी ब्रिटिश राजवटीचा राक्षसी कळस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाला सन २०१९ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ते औचित्य साधून साम्राज्यवादी शासक म्हणून केलेल्या अत्याचारांबद्दल प्रायश्चित्त घेण्याची ब्रिटनला नामी संधी आहे,असे सांगून थरूर म्हणाले की, त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी किंवा तेथील राजघराण्यातील सदस्याने भारतात येऊन केवळ जालियनवाला हत्याकांडाबद्दलच नव्हे तर एकूणच साम्राज्याच्या शासनकाळात केल्या गेलेल्या कृष्णकृत्यांबद्दल भारतीय नागरिकांची मनापासून माफी मागावी.थरूर म्हणाले की, भारत आणि अन्य वसाहतींमधून ब्रिटिश साम्राज्याने जी लूट केली ती केली गेली नसती तर आज लंडन जसे दिसते तसे दिसलेही नसते. या लुटीची रास्त मोजदाद करता येणार नाही व कोणतीही रक्कम तिची भरपाई करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही.अशा प्रकारे माफी मागून झालेल्या चुकांची कबुली दिली की मने साफ होतील आणि भारत व ब्रिटनचे संबंध खऱ्या अर्थी दोन सार्वभौम देशांमधील संबंध म्हणून आकाराला येतील, तोपर्यंत या संबंधांना साम्राज्य आणि वसाहत या ऐतिहासिक संबंधांची झालर कायम राहील, असे ते म्हणाले.थरूर म्हणाले की, ब्रिटनचे आजवरचे वागणे नेमके याच्या उलट असल्याचे दिसते. साम्राज्यशाहीचा कटु इतिहास दडपून टाकण्याची ब्रिटिशांची प्रवृत्ती दिसते. इतिहासाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही. उलट ब्रिटिश इतिहासकार साम्राज्याचे गोडवे गाताना दिसतात. (वृत्तसंस्था)>कॅनडाचे अनुकरण कराया संदर्भात थरूर यांनी कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांचे उदाहरण दिले व सन १९१४ च्या कोमागाता मारु घटनेबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागावी
By admin | Published: January 16, 2017 5:04 AM