नवी दिल्ली: अलीकडेच अन्नपूर्णा देवीची प्राचीन मूर्ती भारताला परत मिळाली होती. यानंतर आता भारतामधून चोरीला गेलेली योगिनी देवीची (Yogini Devi) प्राचीन मूर्ती ब्रिटन परत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ४० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मंदिरातून चोरीला गेलेली योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटनमधून भारतात परत पाठवली जाणार आहे. ही मूर्ती ८ व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रेड आणि इकॉनॉमिक अफेअर्सचे फर्स्ट सेक्रेटरी जसप्रीत सिंग सुखीजा यांनी यासंदर्भात माहिती दिली. लंडनमधील भारतीय उच्चायुक्त योगिनी देवीची मूर्ती परत घेण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. आम्ही मूर्ती परत घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. ख्रिस मारिनेलो आणि विजय कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी ही मूर्ती ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. योगिनी देवीची मूर्ती लवकरच उच्चायुक्तांकडे सुपूर्द केली जाईल, असे ते म्हणाले.
४० वर्षांपूर्वी गेली होती चोरीला
योगिनी देवीची ही प्राचीन मूर्ती सुमारे १९७० च्या उत्तरार्धात किंवा १९८० च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील लोकारी गावातील एका मंदिरातून चोरीला गेली होती. ही प्राचीन मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ‘आर्ट रिकव्हरी इंटरनॅशनल’ या संस्थेचे संस्थापक मारिनेलो यांना ब्रिटनमधील एक महिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर घरातून वस्तू विकत असताना ही मूर्ती सापडली होती. त्यानंतर मारिनेलो यांनी भारतातून चोरलेल्या सांस्कृतिक वस्तूंच्या पुनर्प्राप्तीसाठी समर्पित इंडिया प्राइड प्रोजेक्टचे सह-संस्थापक विजय कुमार यांच्याशी संपर्क साधला, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अलीकडेच भारतातून चोरीला गेलेली एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडामधून पुन्हा मायदेशात परतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० वर्षांपूर्वी अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती भारतातून चोरीला गेली होती. मात्र, भारताचा अमूल्य ठेवा पुन्हा परत मिळाला आहे. कॅनडातून अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परत आणण्यात यश आले असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अन्नपूर्णा देवीची विधिवत पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली.