नर्मदापुरम: भारतात मोठ्या संख्येने ब्रिटीशकालीन इमारती आणि वास्तू आहेत. पण, यातील अनेक वास्तू काळाच्या ओघात जीर्ण झाल्या आहेत. यामुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यात घडली आहे. येथील सुखतवा नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन पूल ट्रकच्या ओझ्याने कोसळला. हा पुल तुटल्याने इटारसी-बैतुलचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, या अपघातात चारजण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठ्या ट्रॉलीमुळे कोसळला पूलमिळालेल्या माहितीनुसार, नर्मदापुरम जिल्ह्यातील सुखतवा नदीवर एक ब्रिटीशकालीन पुल होता. मागील अनेक दशकांपासून या पुलावरुन वाहतुक सुरू होती. पण, आज या पुलावरुन एक अवाढव्य आकाराची 128 चाकी ट्रॉली जात होती, या ट्रॉलीचे वजन पूल पेलू शकला नाही आणि त्या ट्रॉलीसह पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी ट्रॅफिक जाम झाली होती. प्रशासनाने आता मार्ग वळविण्याची तयारी केली आहे.
नेमकी कुठे घडली घटना?ही घटना भोपाळ-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर इटारसीच्या पुढे सुखतबा नदीवरील पुलावर घडली. या ट्रॉलीमध्ये इटारसी येथील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये बसवल्या जाणारी अवजड यंत्रसामग्री होती. हे सामान हैदराबादहून आणले जात होते. ट्रॉली मार्चमध्ये हैदराबादहून निघाली होती आणि रविवारी इटारसीला पोहोचणार होती, पण इटारसीच्या आधीच हा अपघात झाला. पूल कोसळल्यामुळे भोपाळ-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता.