मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनल्याचे ब्रिटीश हेराल्ड 2019 च्या सर्वेक्षणातून पुढे आले. व्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारली. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावं ठेवण्यात आली. मात्र, काही मीडिया चॅनल्सने आणि भाजपा नेत्यांनी ब्रिटीश हेराल्ड हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ऑनलाईन वेब पोर्टल असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे वेबपोर्टल एका भारतीय नागरिकाचे असून नुकतेच एप्रिल 2018 मध्ये ते सुरू करण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्डच्या यादीत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या चौघांची नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नावात ब्रिटिश असलेले हे मॅगझिन ब्रिटिशांनी स्थापन केलेले नसून हेराल्ड मिडीया नेटवर्क नावाची भारतीय माणसाची ही कंपनी आहे. केरळमधील कोचीन हेराल्डचे संपादक अन्सिफ अशरफ हेच या ब्रिटीश हेराल्डचे मालक आहेत. अशरफ यांचे या कंपनीत 85 टक्के शेअर्स असून एप्रिल 2018 मध्ये हे मॅगझिन किंवा ऑनलाईन वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध मॅगझिन असल्याचे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. तरीही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह मोठ-मोठ्या भाजपा नेत्यांनी या ब्रिटीश हेराल्डचे ट्विट रिट्विट करत हा भारताचा मोठा सन्मान असल्याचं म्हटलं आहे.
1. ग्लोबल अलेक्सा रॅन्कींगमध्ये या मॅगझीनला 28158 वे रॅन्कींग आहे. (इंडिया टाईम्सला 190 वे तर एनडीटीव्हीला हेच रँकिंग 395 आहे).
2. ट्विटरवर या मॅगझीनचे केवळ 4125 फॉलोअर्स आहेत. (जगप्रसिद्ध बीबीसी किंवा सीएनएनचे फॉलोअर्स मिलीयन्सच्या आकड्यात असतात. विशेष म्हणजे तुलनेत अनेक जिल्हास्तरीय मीडिया एजन्सीजचे फॉलोवर्स जास्त आहेत)
3. फेसबुकवर या मॅगझीनला फक्त 57000 फॉलोअर्स आहेत.
4. मोदींबाबतच्या या पॉवरफुल ट्विटला या मॅगेझिनच्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ 242 रिट्विट मिळाले आहेत.
दरम्यान, वरील सर्व बाबींमुळे ब्रिटीश हेराल्डला आंतराराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेलं म्हणणं अतिशयोक्ती ठरेल.