मनाली : सीमा रस्ते संघटना (बीआरओ) जगातील सर्वांत उंच बोगदा बांधणार आहे. हिमाचल ते लडाखला शिंकूला खिंडीतून जोडणारा हा बोगदा तयार झाल्यानंतर लडाखच्या झंस्कार खोऱ्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. १६,५८० फूट उंचीवर हा बोगदा बांधण्यात येणार आहे, अशी माहिती बीआरओचे महासंचालक लेफ्ट. जनरल राजीव चौधरी यांनी दिली.
शिंकूला खिंड येथे सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिमाचल ते झंस्कार रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी झंस्कारमधून सहा वाहने शिंकूला खिंडीतून मनालीकडे रवाना झाली. यावर्षी जुलैपर्यंत बोगद्याचे काम सुरू होईल आणि २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी बीआरओला प्रकल्प योजक केले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर झंस्कार खोऱ्याची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल.
दक्षिण आणि उत्तर असे दोन प्रवेशद्वार असतील. दक्षिण प्रवेशद्वार शिंकूला खिंड येथे आणि उत्तर प्रवेशद्वार लखांग येथे असेल.