शाजापूर – कोरोनामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. शाजापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने यात संक्रमणामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. सारंगपूर येथील एका कुटुंबामध्ये कोरोनामुळे दुखा:चा डोंगर कोसळला आहे. याठिकाणी गेल्या ४ दिवसात कुटुंबातील दोन कर्त्या पुरूषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबात केवळ महिलाच वाचल्या आहेत. घराची जबाबदारी २५ वर्षीय मुलगी तन्वी सक्सेना हिच्यावर आली आहे. तन्वीने पहिल्यांदा भावाला मुखाग्नी दिला त्यानंतर आता आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर आली आहे.
सोमवारी स्मशानभूमीत तन्वीने पीपीई किट्स घालून वडिलांना अखेरचा निरोप दिला. वडिलांना मुखाग्नी देताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिलला तन्वीचे निवृत्त शिक्षक असलेले वडील अवधेश सक्सेना, आई करूणा आणि ३२ वर्षीय भाऊ शुभम हे कोरोनाच्या विळख्यात अडकले. या सर्वांना उपचारासाठी शाजापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घरातील ३ जण हॉस्पिटलमध्ये असल्याने तन्वीवर अनेक जबाबदाऱ्या पडल्या.
२९ एप्रिलला भावाने जीव सोडला
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भावाचा मृत्यू झाला. आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन तन्वीने भावाचा मृतदेह ताब्यात घेऊन शांतीवन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलाच्या मृत्यूनंतर आईलाही जबरदस्त धक्का बसला. तन्वीने भावाच्या मृतदेहाला मुखाग्नी देऊन सगळे विधी पार पाडले. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगात तन्वीला मदत केली.
वडिलांनीही साथ सोडली
सोमवारी तन्वीच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होत होती. परंतु वडील अवधेश सक्सेना यांची तब्येत ढासळत गेली. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भावाच्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी वडिलांच्या जाण्याने आई-मुलगी दोघीही सुन्न झाल्या. या कठीण प्रसंगातही तन्वीने आईला सांभाळत कुटुंबाची जबाबदारी पेलली. वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांसोबत तिने शांतीवन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. वडिलांनाही तन्वीने मुखाग्नी दिला.
कुटुंबावर कोरोनाचा कहर झाला आणि अवघ्या ४ दिवसात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक सामाजिक संस्था या कुटुंबाची मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या. सोमवारी तन्वीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकूड एकत्र करण्याचं काम काही कार्यकर्त्यांनी केले. शहरातील अन्य मान्यवरांनीही तन्वीला संकटकाळात मदत करण्याची ग्वाही दिली आहे.