राजस्थानमधील भिलवाडा येथे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाची ओळख करून देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चुलत बहिणीच्या मृत्यूने हादरलेल्या भावाने तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जळत्या चितेत उडी घेतली. यामध्ये तो गंभीररित्या भाजला. मात्र घटनास्थळी उपस्थित लोकांनी कसेतरी त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला भिलवाडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उदयपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
भिलवाडा जिल्ह्यातील बागोर पोलीस स्टेशन क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मृत हिरालाल भिलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सुखदेवच्या काकांची मुलीच निधन झालं. त्याचा धक्का सुखदेवला बसला. तो अचानक शांत झाला. गुरुवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोक्षधाममध्ये चिता प्रज्वलित केल्यानंतर कुटुंबीय व इतर नातेवाईक तेथे बसले होते. दरम्यान, सुखदेव प्रथम बाथरूममध्ये गेला. त्यानंतर अचानक त्याने बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली.
उपचारादरम्यान मृत्यू
हे पाहून तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले. लोकांनी घाईघाईने सुखदेव भीलला जळत्या चितेतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत सुखदेव खूप भाजला होता. त्यानंतर त्यांना तातडीने भिलवाडा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची प्रकृती चिंताजनक पाहून प्राथमिक उपचार करून त्याला उदयपूरला रेफर करण्यात आले. सुखदेव भीलचा शुक्रवारी रात्री उदयपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
दोन्ही भावंडांमध्ये खूप प्रेम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच सुखदेवने मौन पाळले. मुलीच्या मृत्यूतून कुटुंब सावरू शकले नाही, कुटुंबातील तरुण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांची अवस्था बिकट झाली. या अपघातानंतर गावात शोककळा पसरली. पोलिसांनी सुखदेवचा मृतदेह पोस्टमार्टम करून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. गावकरी कुटुंबाचे सांत्वन करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.