शामली : परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं दोन भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिलाय. शामली जिल्ह्यातील येथील झिंझाना भागात राहणाऱ्या दोन भावांनी क्रिकेटवर सट्टा लावला होता. त्यातून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या दोघांनी त्यांच्या पत्नींना दुसऱ्या व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं. मात्र दोघांच्याही पत्नींनी याला नकार दिला. त्यामुळे दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिला. शनिवारी दोन्ही महिलांनी याबद्दलची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली. वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरूय. तलाक देण्यात आलेल्या महिला सख्ख्या बहिणी आहेत. आधी चैसाना येथे राहणाऱ्या या दोघींचा निकाह आठ महिन्यांपूर्वी सहारणपूर जिल्ह्याच्या नकुडमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी झाला. पतींनी तलाक दिल्यानंतर या दोघींनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. 'दोघांचे पती सख्खे भाऊ असून त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायची सवय आहे,' असं दोघींनी तक्रारीत म्हटलंय. पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही भावांचं सट्ट्यात दोन लाख रुपयांचं नुकसान झालं. सट्टा जिंकलेल्या लोकांनी या पैशांसाठी दोघांकडे तगादा लावला. या पैशांची परतफेड करायची नसल्यास पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेऊ देण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना त्या व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. मात्र दोन्ही बहिणींनी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही भावांनी 10 एप्रिलला त्यांच्या पत्नींना तलाक दिला.
धक्कादायक! परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तलाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 9:36 AM