ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मायावती भाऊ आनंद कुमारच्या संपत्तीच्या आकडयामुळे अडचणीत सापडू शकतात. 2007 ते 2014 या काळात आनंद कुमारची संपत्ती 7.5 कोटींवरुन 1316 कोटींपर्यंत पोहोचली.
या काळात मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीही होत्या. आक्रिती हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड कंपनीमुळे मायावती अडचणीत सापडू शकतात. या कंपनीत आनंद कुमार यांची महत्वाची भूमिका आहे. आयकर खात्याच्या चौकशीतून बनावट कंपन्या, कोटयावधी रुपयांची घेतलेली कर्जे, रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक अशी माहिती समोर आली आहे. ही कागदपत्रे टाइम्स नाऊ वाहिनीच्या ताब्यात आहेत.
आक्रिती हॉटेल्स ही दिल्ली स्थित कंपनी आहे. भास्कर फंड मॅनेजमेंट लिमिटेड, क्लिफटॉन पिअरसन एक्सपोर्ट, डेल्टॉन एक्सिम प्रायवेट लिमिटेड, गंगा बिल्डर या कंपन्यांची आक्रिती हॉटेल्समध्ये 5लाख 150 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या तीन कंपन्यांची कार्यालये कोलकात्यात एकाच इमारतीत असून तिन्ही कंपन्यांचे संचालकही सारखेच असल्याची माहिती टाइम्स नाऊने दिली आहे. आक्रिती हॉटेल्समध्ये गुंतवणूक करणा-या काही कंपन्यांची कार्यालये नमूद केलेल्या पत्यावर नसून, शेअर होल्डर्सच्या संख्येमध्येही गौडबंगाल असल्याचे समोर आले आहे.